Home » » सिंधुदुर्गातील गावोगावचे जलस्रोत संकटात

सिंधुदुर्गातील गावोगावचे जलस्रोत संकटात

गाळ ठरतोय डोकेदुखी : दुर्लक्ष झाल्यास भविष्यात पाणीप्रश्‍न आणखी बिकट कळणे : ग्रामीण भागात शेती-बागायती व पिण्याच्या पाण्याचा पारंपरिक स्रोत असलेले ओढे-नद्या गाळाने भरत आहेत. त्यामुळे बारमाही जिवंत असलेले पाण्याचे स्रोत उन्हाळ्यात कोरडेठाक पडत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना व सिंचनासाठी उपसा सिंचन पद्धतीच्या प्रसारामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक स्रोतांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या प्रश्‍नाला पारंपरिक जलस्रोतांकडे दुर्लक्षही कारणीभूत आहे. त्यामुळे स्रोतांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात पाण्याचा प्रश्‍न आणखी बिकट होण्याचा धोका आहे. नद्यांमधील गाळ काढण्याची कोट्यवधींची कंत्राटे काढून पैसे उकळण्याची संधी निर्माण करणाऱ्या शासन-प्रशासनाने या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सिंधुदुर्गच्या पूर्वेला दक्षिणोत्तर सह्याद्रीची पर्वत रांग आहे, तर पश्‍चिमेला अरबी समुद्रकिनारा आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचनाही पूर्वेकडून पश्‍चिमेकडे उताराची आहे. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्याच्या भागाला "खलाटी' व सह्याद्रीच्या पायथ्याच्या परिसराला "वलाटी' असे संबोधले जाते. जिल्ह्यातील बहुतांश नद्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उगम पावतात. "सखला धावे पाणी' या तत्त्वानुसार या नद्यांचे पाणी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने म्हणजे खलाटीकडे वाहत येते. जिल्ह्यातील नद्या या उगमस्थानाकडे आकारमानाने लहान आहेत. "सह्याद्री'मुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नद्यांव्यतिरिक्तही लहान-मोठे ओढे "सह्याद्री'तून वाहतात. हे ओढे गावा-गावांतून वाहत येत समुद्राच्या जवळ आल्यावर एकमेकांना मिळून त्याचे मोठ्या नदीत रूपांतर होते. त्यानंतर या नद्या खाड्यांना जाऊन मिळतात.

जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे सह्याद्रीच्या रांगेमधून उगम पावणारे नद्या-ओढे हे बारमाही स्वरूपाच्या होत्या. या पारंपरिक जलस्रोतांच्या आधारेच जिल्ह्यातील बहुतांश शेती-बागायती तग धरून होती. शिवाय पिण्याचा पाण्याचाही स्रोत होता. गेल्या काही वर्षांत मात्र निसर्गतःच उपलब्ध असलेले पारंपरिक स्रोत दुर्लक्षित झाले आहेत. पाणी उपसा करण्यासाठी कृत्रिम स्रोतांचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे नैसर्गिक स्रोतांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

अनेक नद्या व ओढे गाळाने भरले आहेत. त्यामुळे त्यांचे पात्र अरुंद व उथळ बनले आहे. गाळामुळे त्यातील पाण्याचा साठा कमी झाला आहे. पाण्याचे बारमाही झरे गाळामुळे नष्ट झाले आहेत. या पाण्यावरचे अवलंबित्व कमी झाल्याने कुणाचेच नद्या-ओढ्यांच्या या बदलणाऱ्या परिस्थितीकडे फारसे लक्ष नाही.

तीव्र उतारावरून वाहत येत असल्याने नद्या व ओढ्यातून डोंगर उतारावरचा गाळ वाहून येतो. उन्हाळ्यातील शेती-बागायतीला पाणी मिळविण्यासाठी गावांत नदी-ओढ्यांवर मातीचे बंधारे घातले जात असत; मात्र गाळ पात्रात साचणार नाही, अशा पद्धतीने बंधारे घातले जात असत. त्यामुळे बंधाऱ्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असे. शिवाय भूगर्भातील पाणी पातळीही वाढत असे. एकाच ओढ्यावर अनेक ठिकाणी बंधारे बांधले जात असत. पाण्यासाठी ओढ्यावरतीच अवलंबून राहावे लागत असल्याने ओढ्याच्या अस्तित्वाचीही काळजी वाहिली जात असे. आता हेच ओढे गाळाने भरून त्याचे बारमाही स्वरूप बदलून ते हंगामी झाले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत होणारी प्रचंड वृक्षतोड ओढे-नद्यांच्या मुळावर येत आहे. जळण व फर्निचरसाठी तसेच फळबागायतींच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वृक्षतोडीमुळे डोंगर उतारांची धूप होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून ओढे-नद्यांमध्ये साचत आहे. शिवाय विविध कारणांमुळे जमिनीचे उत्खनन करण्याच्या प्रकारमुळे मातीचे वहन होऊन नद्या-ओढे मातीने भरत आहेत. या भरण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने ओढे आता नावापुरतेच उरल्याचे चित्र आहे.
शेती-बागायतीसाठी नद्या व ओढ्यांमधून पाण्याचा बेसुमार उपसा करण्यातही वाढ झाली आहे. अशा उपशावर कोणतेही निर्बंध नाहीत किंवा त्याबाबतचे शास्त्रीय नियोजनही नसल्याचे दिसते. त्याचाही परिणाम ओढ्यांवर होत आहे. ग्रामीण भागातील पाण्याच्या उपलब्धतेसाठी नद्या-ओढे यांचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. स्रोतांचे स्वरूप बदलत असले, तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यातही त्यांचे महत्त्व अधिक आहे.

नैसर्गिक स्रोत जपण्यासाठी नव्या पिढीत जागृती हवी
शासनाच्या विविध योजनांमुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नळ-पाणी योजना आल्याने प्रत्येकाच्या दारात पाणी आले. आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याने विहिरी, विंधण विहिरींची सुविधा खासगीरीत्या व शासकीय स्तरावरून सार्वजनिकरीत्या उपलब्ध झाल्या. त्यामुळे या नैसर्गिक स्रोतांवरचे अवलंबित्व संपले. परिणामी नव्या पिढीला या नैसर्गिक स्रोतांचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.

गाळ काढण्याचा कृती कार्यक्रम हवा
पाणीप्रश्‍न निर्माण होण्यासाठी नद्या-ओढ्यांतील गाळ कारणीभूत आहे. पाण्याचे हे नैसर्गिक स्रोत बळकट करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत स्तरावर कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. पूर नियंत्रणासाठी नद्यांमधील गाळ काढण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा केला जातो; मात्र पाण्याच्या प्रश्‍नाला कारणीभूत ठरणाऱ्या ओढ्यांच्या मृतावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे.

जलसंधारणाऐवजी निधी संधारणच अधिक
जलसंधारण कार्यक्रमांतर्गत दर वर्षी कोट्यवधींचा निधी खर्चून मातीचे व दगडी बंधारे बांधण्यात येतात; मात्र जलसंधारणापेक्षा निधीचेच संधारण करण्यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक रस असल्याचे दिसते. पारंपरिक जलस्रोतांचा अभ्यास न करता दर वर्षी बंधारे बांधले जात आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा निधी वाया जात आहे.  
पराग गावकर ः सकाळ वृत्तसेवा
Share this article :

0 comments:

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger